लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : चौदावा वित्त आयोग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त आर्थिक निधीतून शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात येणाऱ्या दोन लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तब्बल चारशेहून अधिक कुटुंबांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार असल्याने येथील पाणीप्रश्न मिटणार आहे. शेलपिंपळगाव येथे यापूर्वी नळ पाणीपुरवठा योजनेची ७५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध आहे. मात्र, वाढती लोकसंख्या व स्वच्छ पाण्याचा मुद्दा विचारात घेऊन नागरिकांसाठी नव्याने सेवा देण्याच्या उद्देशाने तब्बल २४ लाख रुपये निधी खर्च करून सुमारे २ लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे काम सुरू आहे. येत्या दीड महिन्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या टाकीचे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी फिल्टर प्लांट बसवून गाव व गावालगतच्या कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी वितरीत केले जाणार आहे. पूर्वीच्या टाकीतूनही नागरिकांसाठी पाणी दिले जाणार असल्याचे सरपंच सुभाष वाडेकर यांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी (दि. ६) नळ पाणीपुरवठा शाखा अभियंता के. एन. खरात, सरपंच सुभाष वाडेकर, उपसरपंच संगीता पोतले, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे आदींनी नव्याने बांधण्यात येणाऱ्या टाकीच्या कामाची पाहणी करून ठेकेदार अमित जोरी यांच्याकडून कामाचा आढावा घेतला.
शेलपिंपळगावचा पाणीप्रश्न सुटणार
By admin | Published: July 07, 2017 2:51 AM