वालचंदनगर : शेळगाव (ता. इंदापूर) येथील बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. बसस्थानक मोडकळीस आल्याने प्रवाशी त्याचा वापर करीत नाहीत. बारामती-इंदापूर या मुख्य रस्त्यावर शेळगाव पाटी येथे नागरिकांच्या मागणीवरून गेल्या १७ वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. या बसस्थानातील आसनव्यवस्था अस्वच्छता शेडवरील पत्र्याची दयनीय अवस्था त्याचबरोबर काटेरी झुडपांचा विळखा वाढल्यामुळे वापराविना अनेक वर्षांपासून धूळखात पडलेले आहे. त्यात फ्लेक्स जाहिराती लावण्यात आलेले असल्याने प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना उन्हा-पावसात रस्त्यावर थांबण्याची वेळ येत आहे. त्वरित या बसस्थानकाच्या समोर परिसरात वाढलेले काटेरी झुडपे कुजलेले पत्रे दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी शिरसटवाडी, शिंगाडेवस्ती, दळवीवस्ती, शेळगाव येथील ग्रामस्थांमधून होत आहे.प्रवाशांना बसण्यासाठी करण्यात आलेले आसनव्यवस्था मोडकळीस आली असल्यामुळे पिकअपशेडची दयनीय अवस्था झाली आहे. त्यात विनापरवाना फ्लेक्सबोर्ड लावण्यात आलेले असून बसस्थानक संपूर्णपणे झाकून गेले आहे. त्यामुळे या प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना या बसस्थानकाचा कसलाही फायदा होत नाही, असून खोळंबा नसून अडचण अशी अवस्था या प्रवाशांची झालेली आहे.
शेळगाव बसस्थानकाची दुरवस्था, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:16 PM