शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव परिसरात कापूसपिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीक वाया गेले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संजय दत्तात्रय मोहिते-पाटील यांना सुमारे ३ लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. संबंधित कापूसपिकाची शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या महसूल विभागांतर्गत तलाठी भाऊसाहेब सूळ यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आदी भागांत कापूसपिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये कापूसशेती पिकविण्याचा प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, शेलपिंपळगाव येथील संजय मोहिते-पाटील यांनी सात महिन्यांपूर्वी ३ एकर क्षेत्रात कापसाच्या बियाण्याची साºयावर लागवड केली होती. साधारण लागवडीच्या २ महिन्यांनंतर पिकाला फुले लागली. मात्र, त्यानंतर लगेचच पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला.कापूसपिकाचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी किमान ७ ते ८ रासायनिक औषधांच्या फवारण्या उत्पादक शेतकºयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कापसाला पीक लागण्यास मदत झाली; परंतु कापूस पीक परिपक्व होऊन अंतिम टप्यात येते ना येते तोच बोंडअळीने पिकावर हल्ला चढविला आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावाने संपूर्ण कपाशीपीक वाया गेले आहे. परिणामी, आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ३ लाखांहून अधिक आर्थिक नुकसान उत्पादक शेतकºयाचे झाले आहे.नुकसानग्रस्त शेतकºयाच्या शेताची सबंधित विभागाने पाहणी करून पंचनामा केला आहे. या प्रसंगी सरपंच सुभाष वाडेकर, ग्रामसेवक उत्तम कांबळे, काळूराम दौंडकर, मधुकर दौंडकर, पांडुरंग दौंडकर, रोहन मोहिते आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते.विपरीत हवामानाचा पिकाला मोठा फटकाकापूसशेतीचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी सुमारे ३ एकर क्षेत्रात लागवड केली आहे. मात्र, विपरीत हवामानाचा पिकाला मोठा फटका सहन करावा लागत आहे. सध्या पीक काढणीलायक झाले असते; मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावाने संपूर्ण पीक वाया गेले आहे. त्यामुळे पिकाची नुकसानभरपाई शासनाने द्यावी.- संजय मोहिते-पाटील, कापूस उत्पादक शेतकरीकापूसपिकाचे नुकसान झाले आहे. या पिकाचा आम्ही पंचनामा केला आहे. सदरचा पंचनामा कृषी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. - भाऊसाहेब सूळ, तलाठी अधिकारी शेलपिंपळगावशेलपिंपळगाव येथील कापूसपिकाचे बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झाले आहे. विदर्भातही बोंडअळीच्याच प्रादुर्भावाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, विदभार्तून नुकसानभरपाईबाबतचे शासनाचे परिपत्रक मागवून घेतले आहे. संबंधित पिकाचा पंचनामा महसूल विभागाकडे पाठविला जाणार आहे.- मंगेश किर्वे, कृषी सहायक अधिकारी खेड
शेलपिंपळगाव परिसर : कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 3:06 AM