अंकुश जगताप, पिंपरीशहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत. कुंपणांमुळे चाऱ्याअभावी नुुसतीच रस्त्याने पायपीट करावी लागल्याने मेंड्या अर्धपोटी राहून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. दौड, बारामती, यवत, तुळजापूर, भिगवन, माळशिरस, शिरूर, टाकळी, पारनेर, संगणमनेर आदी भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. उदरनिर्वाहासाठी विशेषत: बकरी व शेळीपालन हाच प्रमुख व्यवसाय असून दूध व पशुविक्रीतून त्यांना अर्थार्जन होते. या भागात पावसाचे अत्यल्प प्रमाण, तुलनेने हलक्या प्रतिची व दगडगोट्यांच्या जमीनीमुळे शेळ्या मेंढ्यांना चाऱ्याची टंचाई असते. म्हणूनच दरवर्षी मजल दरमजल करीत खडकवासला, पुणे, वाकड, तळेगाव, लोणावळा या मार्गाने तळकोकणात चाऱ्याच्या शोधात भटकावे लागते. काहीजण पाषाण ते ताम्हिणी घाट, भोरमार्गे अथवा चाकण-देहू परिसरातून कोकणात जातात. प्रवासादरम्यान सलग चालत राहण्यापेक्षा या भागात एक मुक्काम आवर्जून ठरलेला असायचा. आपल्या शेतात बकऱ्यांचा वाड्याचा तळ बसवून खत उपलब्ध व्हावे म्हणून मोबदल्यापोटी शेतकऱ्याकडून धनगरांना बकऱ्यांच्या संखेनुसार धान्यरूपात मोबदला दिला जायचा. त्यातून वाड्याला पूढील प्रवासाची तजवीज व्हायची. मुळगावी परततानाही ज्वारी, कांदा तसेच इतर बागायती पिकांची काढणी झालेल्या शेतातील उरलेसुरले पीक व आजूबाजूच्या मोकळ्या मैदानात फुटलेला चारा उपलब्ध व्हायचा. मात्र सध्या शहरांलगतच्या गावांमध्ये नागरिकरण व त्यासाठी जमीन विक्री झपाट्याने झाली आहे. परिणामी लोणी काळभोरपासून ते पिरंगुट, मावळच्या चांदखेड, तळेगाव पट्टयात बहुतेक गावांत ४० ते ७० टक्के शेतीक्षेत्राची विक्री झाली आहे. उरलेसुरले शेतकरी धनगरवाडे बसविण्याकडे कानाडोळा करून रासायनिक खतांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पूर्वी या भागात आवश्यक ठरणाऱ्या मुक्कामाची आश्रयस्थानेच नामशेष होत आहेत. थेट पूढील प्रवासाचे अंतर कापून तळेगावपूढील गावांमध्ये मुक्कामस्थळे हलवावी लागत आहेत. चारा उपलब्ध होणारी शेती तसेच मोकळी मैदाने आता १०० ते ५०० एकरांवरील बड्या गृहप्रकल्पांनी, कुंपनांनी व्यापली आहेत. त्यामुळे पूर्वीच्याच मार्गावरुन जाण्याच्या प्रयत्नात अनेक धनगर वाड्यांचा कोंडमारा होत आहे. मेंढ्यांना चारा मिळणे तर दूरच पण आता मार्ग कुठून काढावा, असाच प्रश्न अनेक धनगरांपूढे आहे. मेंढ्यांना उपाशीपोटी लांबच्या पल्यापर्यंत पिटाळत नेण्याची वेळ आली आहे.