अंदमानात अत्यंत कष्टप्रद शिक्षा भोगत असतानाही त्याच्या मनातली इंग्रजांविरुद्धची आग विझली नव्हती. खुल्या तुरुंगवासात कैद्यांकडून बेटांवरील बांधकामे, दगड फोडणे, वृक्ष तोडणी वगैरेसारखी कामे करून घेतली जात. अशीच कामे करताना त्याने एखादे लोखंडी शस्त्र मिळवले असावे. योग्य संधीची तो वाट पाहत होता. ब्रिटीशांचा भारतातील सर्वोच्च अधिकारी म्हणजे व्हाइसराय. त्यावेळी व्हाईसराय असलेला लॉर्ड मेयो अंदमानला भेट द्यायला आला होता. चांगल्या वागणुकीमुळे सवलत मिळालेला शेर अली बेड्यांविना असावा. न्हाविकाम, अंदमानला येणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था अशी कामे त्याच्याकडे होती. अंदमानची पाहणी करुन परत जहाजाकडे निघालेल्या लॉर्ड मेयो यांच्यावर संधी साधून शेर अलीने अचानकपणे आपल्याकडील हत्याराने हल्ला केला. गंभीर जखमी झालेला लॉर्ड मेयो अंदमानातच मृत्यू पावला.
शेर अलीला अटक करुन लगेचच ८ फेब्रुवारी १८७२ या दिवशी वायपर बेटावर फाशी देण्यात आलं . भारताच्या व्हाईसरायचा वध होण्याची ही भारतीय इतिहासातील एकमेव घटना.
शेर अली च्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. पण इंग्रजांच्या सर्वोच्च अधिकार्याचा वध करणारा क्रांतिकारक म्हणून त्याचे नाव अमर झाले आहे. १८५७ नंतर इंग्रज सत्तेला हा बसलेला मोठा धक्काच होता.