धायरी (पुणे): शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र कोषाध्यक्ष राहुल पोकळे यांचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश झाला. धायरी येथील राहुल पोकळे हे गेली 20 वर्षांपासून पुरोगामी चळवळीत काम करत असून अनेक सामाजिक आंदोलनात भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.
राष्ट्रसेवा समूह या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहे. सामुदायिक विवाह, 300 गावात संविधान जनजागृती यात्रा, प्रबोधन शिबिरे इत्यादी अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केलेली आहेत. महिला बचत गटांचे विस्तृत जाळे, युवकांचे असलेले संघटन, राज्यभरात असलेले काम, संघटनाचा राष्ट्रवादीला फायदा होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने पक्ष संघटन त्यांचा कसा उपयोग करून घेते हे पहावे लागेल. मागील 2 निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून झालेला निसटता पराभव हा अनेकांनी दखल घ्यावा असा होता. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राहुल पोकळे यांचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
"पुरोगामी विचारांच्या चळवळची आज गरज आहे. सनातनी विचारांना रोखण्याची ताकद पुरोगामी पक्षात आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे." असे मत राहुल पोकळे यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात असंख्य कार्यकर्त्यांच्या जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच प्रभागात घेणार असल्याचे सांगितले. प्रवेशावेळी अजित पवार यांच्या सोबत महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, सुरेश घुले, काकासाहेब चव्हाण, विकास दांगट आदी मान्यवर उपस्थित होते.