शिबा कुरिझ, शिबा निधी चिट फंड घोटाळ्यातील आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:42 AM2021-10-04T09:42:01+5:302021-10-04T09:55:03+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात बोपोडी येथील शिबा कुरिझ व शिबा निधी या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे : गुंतवणूक फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामिनावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने शिबा कुरिझ व शिबा निधी या चिट फंड संस्थेच्या संचालकांना दणका दिला आहे. त्यांना खडकी पोलीस ठाण्यात तीन दिवसांत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. मेलुकुलम दामोदरन श्रीनिवासन, सीमा मेलुकुलम श्रीनिवासन व अरुण मेलुकुलम अशी या संचालकांची नावे आहेत.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात बोपोडी येथील शिबा कुरिझ व शिबा निधी या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. खडकी पोलिसांनी केलेल्या युक्तिवादामुळे सत्र न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयात २४ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी आरोपींनी वकिलांमार्फत सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने ४, ५ व ६ ऑक्टोबर असे तीन दिवस खकडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यावेळी गुंतवणूकदार हे त्यांनी गुंतवणूक केलेली हे दाखविण्याकरिता हजर राहू शकतात, असे आदेशात म्हटले आहे.
याबाबत खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, शिबा कुरिझ व शिबा निधी बोपोडी या संस्थेकडून ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे. ते गुंतवणूकदार ४ ते ६ ऑक्टोबर रोजी खडकी पोलीस ठाण्यात हजर राहू शकतात. तसेच ज्यांना हजर राहाता येणार नाही, असे गुंतवणूकदार खडकी पोलीस ठाण्याच्या ई-मेलवर pskhadki.pune@nic.in आपली तक्रार करू शकतात.