पुणे : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ते मुळा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर (वळू पैदास केंद्राजवळ) जाणार आहे. जानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरूवात होईल.मेट्रोच्या भुयारी मार्ग प्रकल्पाचे प्रमुख अभियंता प्रमोद आहूजा यांनी ही माहिती दिली. ५ किलोमीटरच्या या भूयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असणार आहे. ते काम सुरू करण्यासाठी म्हणून एसटी स्थानक हलवण्यात येईल. मुळा रस्त्यावर कृषी महाविद्यालयाची एक जागा आहे. त्या जागेवर एसटी स्थानक असणार आहे. त्याचे आता आहे तसेच बांधकाम महामेट्रो करून देणार आहे. एसटी महामंडळाबरोबर यासंदर्भात बोलणी झाली असून त्यांची याला संमती आहे.आहूजा म्हणाले, हा मार्ग ५ किलोमीटरचा आहे. त्यात ५ भुयारी स्थानके असतील. शिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलिकडे रेंजहिल येथे मेट्रोचा भुयारात प्रवेश होईल. तिथे एक स्थानक असेल. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आताच्या जागेवर भुयारी मार्गातील दुसरे, त्यापुढे फडके हौद (कसबा पेठ), मंडई (जुनी मिनर्व्हा टॉकिजजवळ) व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके असतील. त्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही येत्या १५ दिवसात पूर्ण होईल. जानेवारीच्या सुमारास कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. मेट्रो भुयारात शिरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शाफ्टचे काम सुरू झाले आहे. सर्व कामांची आरेखने तयार व अंतिम झाली असल्याची माहिती देऊन आहुजा म्हणाले, भुयारी काम बरेच क्लिष्ट आहे. त्यामुळे किमान २ वर्षे तरी शिवाजीनगर एसटी स्थानक बाहेरच असेल. भुयारी स्थानकाचे काम झाल्यावर मात्र पुन्हा पूर्वीच्याच जागी एसटी स्थानक बांधण्यात येईल. हा सर्व खर्च अर्थातच मेट्रो करणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाची संमती मिळाली आहे. फडके हौद व अन्य काही स्थानकांच्या इथे खासगी जागा संपादन करावे लागणार आहे. फडके हौद वगळता अन्य ठिकाणी फारशा अडचणी नाहीत. फडके हौदाजवळ मात्र काही कुटुंबे यात बाधीत होणार आहेत. त्यांना जागा देण्यात येईल. जागा मालकांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल. याबाबत बोलणी सुरू आहेत.
शिवाजीनगर एसटीस्थानकाचे जानेवारीत स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 8:03 PM
शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असणार आहे. ते काम सुरू करण्यासाठी एसटी स्थानक हलवण्यात येईल.
ठळक मुद्देमेट्रो भुयारी मार्गाचे काम: दोन वर्षांसाठी मुळा रस्त्यावर जाणारजानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरूवातशिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलिकडे रेंजहिल येथे मेट्रोचा भुयारात प्रवेश