लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या शिकलकरी टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
टोळीप्रमुख तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा. रामटेकडी) निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय २३, रा. महंमदवाडी), सुनील प्रकाश गायकवाड (वय २३, रा. रामटेकडी) गणेश राजेंद्र शिवाडकर (वय २१, रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार किशोर प्रशांत गायकवाड आणि आकाश गणपत माने यांनी पलायन केले.
मोक्का कारवाई केलेले तिलकसिंग आणि निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे हे साथीदारांसह उरळी कांचन परिसरातील डाळींब गावानजीक कॅनल रोडने येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांना मिळाली. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या सूचनेनुसार गुंगा जगताप व त्यांच्या पथकाने कॅनल रोडवर गाडी बिघडली असल्याचा बहाणा करून सापळा रचला. मोटारीतून आलेल्या तिलकसिंग व इतरांना मदतीचा बहाणा करून थांबविले. तेव्हा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
या टोळीकडून वाहनचोरीचे ४ व घरफोडीचे ३ असे ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या व २ लाख ३० हजार रुपयांच्या ४ कार असा माल जप्त केला आहे. तसेच, ताब्यात घेतले त्यावेळी एक कार व एक गावठी पिस्तूल असा एकूण ३ लाख ५० हजार ३६० रुपयांचा माल जप्त केला आहे.
तिघांविरुद्ध ८१ गुन्हे
तिलकसिंग गब्बरसिंग टाक याच्याविरुद्ध दरोडा, जबरीचोरी, घरफोडी, वाहनचोरी असे ६७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे याच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. सुनील ऊर्फ बावड्या प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत.