भोर तालुक्यात २१ जुलैला भोर-शिरवली-दुर्गाडी एसटी बस अजित गायकवाड व सर्जेराव जेधे हे चालक-वाहक तर भोर-पसुरे-शिळींब ही गाडी आप्पासो जाधव व अरुण साळुंके हे चालक-वाहक दोन गाड्यांसह मुक्कामी दोन्ही गावांत गेले. मात्र २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत शिळीम व दुर्गाडी या मुक्कामी गेलेल्या एसटी बस २८ दिवस अडकून पडल्या होत्या. २८ दिवसांनी रस्ता सुरळीत झाल्यावर वाहक-चालकांसह भोर बस आगारात बुधवारी १८ ऑगस्टला भोर आगारात आणल्या. तालुक्यातील नीरा देवघर धरणभागातील शिळीम व दुर्गाडी या एसटी बस गावांना २१ जुलैला मुक्कामी गेल्या होत्या. मात्र याच दिवशी अतिवृष्टी झाल्याने रस्त्यांवर दरडी कोसळल्या, तर रस्ते वाहून गेले. रस्ते खचल्याने भोर-पांगारी-धारमंडप रस्त्यावरील व नीरा देवघर धरणांतर्गत असलेल्या भोर-दुर्गाडी या रिगरोडवरील वाहतूक बंद झाली होती आणि गावांचा संपर्क तुटलेला होता. यामुळे भोर एसटी आगाराच्या दोन गाड्या त्याबरोबर असणारे चालक व वाहक अडकून पडले होते. यातील एका बसचे चालक व वाहक आजारी पडल्याने ३५ किलोमीटर पायी चालत भोरला आले होते, तर बसबरोबर मुक्कामी असणारे चालक व वाहकांची चहा, नास्ता व दोन वेळचे जेवण ग्रामस्थांकडून दिल्याचे चालक-वाहक यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे रस्ता बंद झाल्याने भोर एसटी आगारातील दोन एसटी बस आणि चालक-वाहक अडकून पडलेले होते. त्यांच्याशी फोनवर संपर्क केला जात होता. अनेकदा रेंज नसल्यामुळे संपर्क होत नव्हता. चालक-वाहक यांना पूर्ण वेतन देण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख युवराज कदम यांनी सांगितले.