पुणे : हृदयातील भावना चेहऱ्यावर उतरवत सर्वांच्या मने जिंकणारा हीमॅन धर्मेंद्र....‘चौदहवी का चाँद’ होत लिव्हिंग लिजंडचा टप्पा गाठलेली वहिदा रहमान... वयाच्या १४ व्या वर्षापासून चित्रसृष्टीवर व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जयाप्रदा यांच्याशी रंगलेल्या गप्पांमधून आठवणींचा एक एक धागा गुंफला गेला. अनोख्या रेशीमगाठी जुळत मंच जणू ‘झिलमिल सितारों का आँगन’ बनले... अन् या बहारदार मैफलीत रसिक न्हाऊन निघाले. सिंबायोसिसच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने एसआयएमसीचे संचालक अनुपम सिद्धार्थ यांनी धर्मेंद्र, वहिदा रहमान आणि जयाप्रदा यांच्याशी गप्पांचे धागे विणले आणि यातून तयार झालेल्या रेशमी शालेची प्रेमरुपी ऊब आबालवृद्धांपर्यंत पोहोचली. तिघांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपटांमधील गाण्यांच्या आणि संवादांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.धर्मेंद्र म्हणाले, ‘चित्रपटाचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना केवळ अभिनयावरील प्रेमापोटी मी चित्रसृष्टीत आलो. सुरय्या यांच्या ‘दिल्लगी’ या चित्रपटाचे मी अक्षरश: पारायण केले. बिमल रॉय आणि गुरुदत्त यांच्या ‘फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट’मध्ये मी सहभागी झालो आणि नशिबाने माझी निवडही झाली. माझ्या प्रत्येक श्वासात अभिनयाचे प्रेम दडले आहे. कॅमेरा हेच माझे आयुष्य आहे. कॉमेडी, अॅक्शनवर प्रेम करायला शिकलो. पण, मला नृत्य कधीही जमले नाही.’मी आजवर ७२ अभिनेत्रींबरोबर स्क्रीन शेअर केली आहे, असे सांगत, ‘दिल अभी जवाँ है’ म्हणत धर्मेंद्र यांनी दाद मिळवली. बंदिनी, यमला पगला दिवाना, आती रहेगी बहारें, सत्यकाम, शोले अशा अनेक चित्रपटांच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या. ‘शोले’ मध्ये माझ्यामुळे अमिताभची निवड झाली, हे तो इतक्या वर्षांनी कबूल करीत वाहवा मिळवत आहे आणि शत्रुघ्न मला शिव्या घालत आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. एका तेलगू चित्रपटात केलेले नृत्य... त्यानंतर गुरुदत्त यांना भेटण्याची मिळालेली संधी... सीआयडी, प्यासा या चित्रपटाच्या आठवणी अशा अनेक आठवणी सांगत वहिदा रहमान यांनी रसिकांसमोर ओंजळ रिती केली. त्या म्हणाल्या, ‘आजच्या काळातील गाणी तात्पुरती लक्षात राहतात.’ (प्रतिनिधी)
‘झिलमिल सितारों का आंगन’; बहारदार मैफिल
By admin | Published: January 25, 2016 12:50 AM