बारामती (पुणे) : बारामतीलोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अद्याप ‘लोकसभे’ची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषणा होणेच बाकी असल्याचे सध्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दोन सभा घेतल्या आहेत. शुक्रवारी (दि. २४) इंदापूर येथे अजित पवार यांची सभा होणार आहे. त्यापाठोपाठ येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने महायुतीचे बडे नेते म्हणून ओळख असणारे नेते बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे संकेेत आहेत.
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्याचा भाजपने चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात रणनीती आखली आहे. यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झालेले अजित पवारदेखील आक्रमक झाले आहेत. बारामतीत उपमुख्यमंत्री पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरविणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र, खुद्द अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा परिवार वगळता इतर कुटुंबीय सुनेत्रा पवार यांच्या विरोधात, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उघडपणे उतरले आहेत. यामध्ये आमदार रोहित पवार तसेच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत.
पवार यांनी आता महायुतीचे बडे नेते बारामतीच्या रिंगणात आणण्याचे नियोजन करून वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. बारामती शहरातील अद्ययावत बसस्थानक, पोलिस उपमुख्यालयाच्या उद्घाटनासह २ मार्च रोजी होणाऱ्या नमो महाराेजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे हे तीनही बडे नेते बारामतीत प्रथमच एकत्र येत असल्याने ते बारामती लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या कार्यक्रमात हे नेते बारामतीत काय बोलणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. यापाठोपाठ शरद पवार गटाच्या वतीने खुद्द शरद पवार देखील लवकरच बारामतीत सभा घेण्याची शक्यता आहे.
युगेंद्र पवार यांचे सुचक संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आज लोकसभा निवडणुकीसाठी चिन्ह जाहीर झाले. त्यानंतर युगेंद्र पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत त्यांचे छायाचित्र पोस्ट केले आहे. यावर ‘दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशा शब्दात युगेंद्र यांनी पुन्हा शरद पवार यांची साथ देणार असल्याचे संकेत दिले आहेत.