पुणे : शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालयात शिरुन कागदपत्रे फाडून तेथील शिपायांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शंकर कांतीलाल झरड (वय ३५, रा. शिंदवणे गावठाण) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मदन पोपट कांबळे (वय ३८, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शंकर झरड हे मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आले व त्यांनी कांबळे यांना ग्रामसेवक कुठे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा कांबळे यांनी ग्रामसेवकाला फोन लावून दिला. त्यांचे बोलणे झाल्यावर शंकर झरड याने आरडाओरडा करुन संगणक ऑपरेटरच्या टेबलावर ठेवलेले सरकारी कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून व फाडून टाकले. त्यांना समजावण्यासाठी आलेले शिपाई बाळु जाधव व शेख शिरवळे यांना अरेरावी केली. शिरवळे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना भिंतीला आपटून दुखापत केली. मी आत्महत्या करुन तुम्हा सर्वांना तसेच ग्रामपंचायत बॉडी व अण्णा महाडिक यांच्यावर आत्महत्या करण्याची चिठ्ठी लिहिणार आहे, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.