रेडणी : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीने मेक इन इंडियाअंतर्गत भारतीय बनावटीचा आतापर्यंत आयात करावा लागणारा महत्त्वाचा गिअर बॉक्स तयार केला आहे. याचा उपयोग भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजासाठी होणार असून वालचंदनगर कंपनीच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी केली असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई यांनी दिली.वालचंदनगर कंपनीचा अनेक वर्षांपासून देशउभारणीच्या कामामध्ये सातत्यपूर्ण सहभाग आहे. कंपनीने मेक इन इंडियाअंतर्गत भारतीय बनावटीचा स्वदेशी मरीन गिअर बॉक्स तयार केला आहे. हा गिअर बॉक्स तटरक्षक दलाच्या जहाजामध्ये बसविण्यात येणार आहे. या गिअर बॉक्सचे संपूर्ण डिझाईन व निर्मिती वालचंदनगर कंपनीने केली आहे. यापूर्वी तटरक्षक दलाच्या जहाजासाठी लागणारे गिअर बॉक्सेस परदेशातून आयात करावे लागत होते. मात्र वालचंदनगर कंपनीमुळे गुंतागुंतीचा स्वदेशी गिअर बॉक्स यशस्वीरीत्या तयार केल्यामुळे परदेशातील आयात थांबण्यास मोलाची मदत होणार आहे. आज शनिवारी वालचंदनगर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर वाल्मीक शुक्ला, गिअर डिव्हिजनचे प्रमुख संजय गायकवाड, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आनंद नगरकर, अमोल मडके यांच्या हस्ते गिअर बॉक्स गोवा शीप यार्ड कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला.अशी आहे गिअर बॉक्सची रचना...हा गिअर बॉक्स संपूर्ण स्वदेशी बनावटीचा असून गिअर बॉक्सची पॉवर ट्रान्समिशन क्षमता ९१०० किलोवॉट असून इनपुट स्पीड ११५० व आऊटपुट स्पीड २२८ आर. पी. एम. आहे. गिअर बॉक्सचे वजन २४ टन असून लांबी तीन मीटर व रुंदी अडीच मीटर आहे. या गिअर बॉक्सला लागणारी सर्व उपकरणे गिअर बॉक्सवरच बसवली असून तसेच फायर फायटिंग पंपला ड्राईव्ह करण्याची सोयदेखील गिअर बॉक्समध्ये केली आहे.
वालचंदनगर कंपनीत तयार झाला जहाजाचा गिअर बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 2:16 AM