पुणे : बांधकाम व्यावयायिक डी. एस. कुलकर्णी(डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी (३३, रा. चतु:शृंगी) हा कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरमध्ये दरमहा ४ लाख रुपये भाडे देऊन राहत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी शिरीष याला सोमवारी न्यायालयात हजर केले. त्याच्या पोलीस कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे. शिरीष हे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या डीएसके मोटर्स प्रा. लि. कंपनीमधून भाडे देत होते, असे तपासात निष्पन्न झाले. ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांनी १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मुख्य आरोपी दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके), पत्नी हेमंती, मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे, पुतणी सई, तिचा नवरा केदार वांजपे, महाराष्ट्र बँंकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह १३ जणांना अटक केली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिरीष २५ जून रोजी येथील सत्र न्यायालयात शरण आला होता. शिरीषची पत्नी तन्वी हिच्यावरही गुन्हा दाखल आहे. तिच्या खात्यात त्याने १२ कोटी रुपये वर्ग केले आहेत. तो भागीदार असलेल्या कंपनीने रिझर्व बँंकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदा मुदत ठेवी स्वीकारल्या. त्या कंपन्या डीएसके ग्रुप आॅफ पार्टनरशिप फर्म या कंपनी अॅक्टखाली नोंदणी केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मुदत ठेवी स्वीकारण्याचा अधिकार नाही. फुरसुंगी येथील हायब्लीसचे एनसीडीकडे गहाण असलेले १११ फ्लॉट गुंतवणूकदारांची परवानगी न घेता शिरीष याने कोट्यवधींना विकल्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.माहिती देण्यास टाळाटाळशिरीष याची आई हेमंती यांच्या खात्यावरून त्याच्या बँंक आॅफ महाराष्ट्रच्या चालू खात्यावर तब्बल १४३ कोटी वर्ग झाले. याबाबत माहिती देण्यास तो टाळाटाळ करत आहे. तो संचालक असलेल्या डीएसके मोटर्स, डीएसके मोटोव्हिल, तलिस्मान हॉस्पिलिटी सर्व्हिस प्रा. लि. आणि डीएसके शिवाजीन्स फुटबॉल क्लब प्रा. लि. या कंपन्यांमध्ये ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रकमेपैकी ५१ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्याने २०११मध्ये टाकवी बुद्रूक येथे २३ एकर जमीन ३६ कोटी रुपयांना विकत घेतली. ही जमीन स्वत:च्याच डीएसके मोटोव्हील या कंपनीला दर महिना ४६ लाख रुपये भाड्याने दिली होती, असे रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
शिरीष कुलकर्णीच्या ट्रम्प टॉवरमधील घराचे महिन्याचे भाडे ४ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 3:07 AM