शिक्रापूर : शिरूर-शिक्रापूर पुणे हा मार्ग आठपदरी होणार असून यासाठी सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.या रस्त्यावरील वाघोली व शिक्रापूर येथील वाहतूक समस्या हा कळीचा मुद्दा होता. म्हणून पहिल्या टप्प्यात वाघोली ते शिक्रापूर हा मार्ग विकसित केला जाईल. वाघोलीत दोन पर्याय असून एकतर बायपास करणे किंवा दुसरा फ्लायओव्हर करणे. बायपास आठपदरी तर फ्लायओव्हर सहापदरी होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या कुठले सोयीचे आहे, याबाबतची तपासणी चालू आहे. बायपाससाठीलागणाऱ्या जमिनीच्या किमतीत फ्लायओव्हर होऊ शकतो, असे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य सरकारने समन्वयाने मार्ग काढावा, असेही सुचविले असल्याचे खासदार आढळराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलेशिरूर-पुणे या राज्य मार्गावरील वाहतूक समस्येचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी हा मार्ग ‘नॅशनल हायवे’कडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. आठपदरीसह या रस्त्याच्या संपूर्ण कामासाठी सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या दळणवळण मंत्रालयाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली.या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, बायपास, फ्लायओव्हर आदी महत्वपूर्ण कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात वाघोली ते शिक्रापूर आणि त्यापुढील टप्प्यात शिरूरपर्यंतच्या मार्गाचा या प्रकल्पात समावेश असून आठपदरीचे नियोजन आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. या प्रकल्पासाठी निधीची कुठलीच अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे,खासदार आढळराव म्हणाले, शिरूर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने वाघोली ते शिक्रापूर या मागार्साठी हायब्रीड आॅन्युइटी अंतर्गत सव्वादोनशे कोटी रुपये मंजूर केले होते. पण तेवढ्याने हे काम होणार नाही. या मार्गावरील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. हा रस्ता ‘नॅशनल हायवे’कडे हस्तांतरित केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यालाएन एच ७५-३ एफ हा क्रमांकदेखील पडला आहे. रुंदीकरण, फ्लायओव्हर व इतर कामांचे डीपीआर करण्यासाठीचे कंत्राट दिले आहे. येत्या आठ-दहा दिवसांत डीपीआर काम चालू होईल, अशी माहिती खासदार आढळराव यांनी दिली.
शिरूर-शिक्रापूर-पुणे होणार आठपदरी, खासदार आढळराव यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:44 AM