शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शिर्सुफळ तलावातून जिरायती भागातून गावांना होणारा पाणीपुरवठा शिर्सुफळ ग्रामस्थांनी रविवारी (दि. ११) रोखला. तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. खडकवासल्यातून पाणी सोडून शिर्सुफळ तलावातील पाणीसाठा पूर्ववत करावा. त्यानंतरच पाणी सोडावे, अशी भूमिका शिर्सुफळ ग्रामस्थांनी घेतली आहे. शिरसाई उपसा सिंचन योजनेतून शिर्सुफळ योजनेद्वारे जिरायती भागातील १७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांत खडकवासला कालव्याच्या आवर्तनातून हा तलाव भरण्यात आला होता. त्यानंतर जिरायती भागातील १७ गावांना पाणी सोडण्यात आले. मात्र, सोडलेल्या पाण्यामुळे शिर्सुफळ तलावातील पाणीसाठा हळूहळू घटला. गेल्या दोन दिवसांपासून उपसा सिंचन योजनेपासून पंपगृहाला पाणी मिळत नसल्याने तलाव कोरडा पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच जवाहरलाल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी पंपगृह बंद पाडले. तसेच, बाहेरील गावांना सुरू असणारा पाणीपुरवठादेखील बंद पाडला. या तलावात खडकवासला कालव्याचे सुरू असलेले आवर्तन अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिर्सुफळ तलावात खडकवासल्यातून पाणी द्यावे, शिर्सुफळ तलावाचा पाणीसाठा पूर्ववत करावा, अशी मागणी सरपंच सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की शिर्सुफळ तलाव क्षेत्र मोठे आहे. खोलीकरण झाल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिवाय तेथे पाऊस नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार तेथे ५० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. त्यातून केवळ २० दशलक्ष लिटर पाणी गावांमधील शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे शिर्सुफळच्या शेतकऱ्यांना विशेष अडचण येणार नाही. नोव्हेंबरमध्ये रब्बीचे खडकवासल्यामधून तलावात पुन्हा आवर्तन सोडण्यात येईल. शिर्सुफळ येथील शेतकऱ्यांनी चिंता करू नये. दुष्काळी शेतकऱ्यांना तलावातून पाणी मिळाल्यास दिलासा मिळेल. त्यामुळे शिर्सुफळ ग्रामस्थांनी समन्वयाची भूमिका घेऊन पाण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करावी. गैरसमजातून तणाव निर्माण होईल. हा तणाव निर्माण करण्यासाठी काही प्रवृत्ती प्रयत्नशील असल्याचे खैरे म्हणाले.
‘शिर्सुफळ’चे पाणी रोखले
By admin | Published: September 12, 2016 2:27 AM