शिरूर (पुणे): शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार (ncp mla ashok pawar) यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यावर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून धमकी देणाऱ्याचा तात्काळ शोध घेऊन आमदार अशोक पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
याबाबत शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रारी निवेदन दिले आहे. त्यानुसार त्यांनी दिलेली माहिती अशी की, काल रविवार दि. १७ रोजी शहरातील काही लोकांना निनावी पत्र आले असून त्यामध्ये शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची व त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार यांची निनावी पत्राव्दारे बदनामी करुन आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे.
या पत्रात काही नगरसेवक व इतर काही मान्यवर लोकांची देखील बदनामी केलेली आहे. त्यामुळे शिरुर शहरात दहशतीचे वातावरण झाले असून त्या निनावी पत्र लिहिणा-या लोकांचा योग्य प्रकारे तपास करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख व पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांचेकडे केली. यावेळी नगरपरिषद ते पोलिस ठाण्यापर्यंत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पायी निषेध मोर्चा काढुन निषेध करत पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना निवेदन दिले. यावेळी संतोष भंडारी, मुजफ्फर कुरेशी, विनोद भालेराव, सुभाष पवार, राजेंद्र जगदाळे, विश्वास ढमढेरे, विद्या भुजबळ, मयुर थोरात यासह कार्यकर्त्यांनी या निनावी पत्राचा निषेध करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांना केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संतोष भंडारी, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार ,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे रविंद्र काळे, ॲड. प्रदिप बारवकर, महिला राष्ट्रवादीचे विद्या भुजबळ, संगिता शेवाळे, शहराध्यक्ष सौदामिनी शेटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, रंजन झांबरे , बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, माजी संचालक जगनाथ पाचर्णे, राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते जयसिंग कर्डिले, हरिदास कर्डिले, सुरेश चव्हाण,माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, नगर सेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, अबिद शेख, तुकाराम खोले, शिरूर रामलिंग चे सरपंच नामदेव जाधव, कॉंग्रेस चे शहराध्यक्ष ॲड. किरण आंबेकर , भाजपाचे विजय नरके, शिवसेनेचे मयुर थोरात, आपचे शहराध्यक्ष अनिल डांगे, मनसेचे अविनाश घोगरे, सुशांत कुटे, रवि गुळादे, बंडु दुधाने यासह सर्व पक्षीय व संघटनांचे तालुक्यातील स्थानिक कार्यकर्ते महिला उपस्थित होते.