शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे ४० ऑक्सिजन बेड धूळ खात पडून आहेत. याठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. परंतु त्यात डॉक्टर व स्टाफ यांची भरतीच झाली नाही. त्यामुळे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू नसून त्यास सर्वस्वी आरोग्य विभाग कारणीभूत आहे. १७ मेपर्यंत या ऑक्सिजन बेडचे युनिट सुरू न केल्यास बेमुदत उपोषणचा इशारा पुणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना भेटून येथील अडचणी समजून घेतल्या. यावेळी पाबळचे सरपंच मारुती शेळके, माजी सरपंच सोपान जाधव, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भगवान घोडेकर,संदीप साकोरे, रमेश ढोले, विठल वाघ, उपस्थित होते.
पाबळ येथील रुग्णालयातील बेड वापराविना का पडून आहेत? याबाबत पाचंगे यांनी तहसिलदार लैला शेख यांना विचारले असता, त्यांनी आरोग्य विभागाला याबाबत कळविले होते. मात्र तरीही ते कार्यान्वित करण्यात आले नाही. याबाबत पाचंगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्टाफ नसल्यामुळे ऑक्सिजन बेड कार्यान्वित नसल्याचे सांगितले. हा एकंदरीत गंभीर प्रकार असून आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप पाचंगे यांनी केला आहे. १७ मेपर्यंत हे बेड कार्यान्वित करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचाा इशारा त्यांनी दिला आहे.