कोरेगाव भीमा: शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार हे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर मते मागून निवडून आले. परंतु त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी कडे जाणार्या रस्त्याला निधी आणला नाही, खासदार आहेत कुठे शिरूर चे खासदार हरवले असून खासदारांना शोधा रोख बक्षीस मिळवा अशा आशयाचे पोस्टर एका पदाधिकाऱ्यांने चौफुला येथे लावल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेना नुकतेच उधाण आले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार Dr. Amol Kolhe अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यती बाबत एका वर्षात निर्णय घेऊन बैलगाडा शर्यत सुरू करून बैलगाड्या समोर घोडी पळवीणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर खासदार पदी डॉ. अमोल कोल्हे विराजमान होताच बैलगाडा शर्यत सुरू होण्याची आशा बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांना लागलेली होती. तर कित्येक वेळेस लोकसभेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती बाबत आवाज उठविला आहे. सध्या शिरूर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी कडे जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याची दुरवस्था झाल्याने याबाबत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत सदर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. वाजेवाडीचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी चौफुला येथे खासदार तुम्ही नक्की कुठे हरवलात, खासदारांना शोधा रोख बक्षीस मिळवा या आशयाचे लावले.
यामध्ये संभाजी महाराजांच्या समाधीस्थाली जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक सह पाबळ येथील जैन मंदिर , मस्तानी ची कबर , केंदुर येथील संत कान्हूराज महाराज या स्थळांना जोडणाऱ्या रस्त्याची मागणी केली. मात्र हे आरोप प्रत्यारोप करून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा रस्ता होणार का? नागरिकांची कामे मार्गी लागणार का? खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदार संघातील दौरे करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी अमित सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कोरेगाव पाबळ रस्त्यावरील खड्यात वृक्षा रोपण करून प्रशासनाचा निषेध केला . याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.