मंचर (पुणे) : आजारपणातून बरे झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंचर येथील कार्यालयात प्रथमच थांबून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा कार्यकर्त्यांसमवेत केली. दरम्यान, आज मंचर येथे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची सहविचार सभा घेण्यात येणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी घरात अपघात झाल्याने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गेली अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यांना बरेच दिवस रुग्णालयात थांबावे लागले. प्रचार काळात ते मंचर येथे एकदा आले होते. मात्र त्यांना उपचार घेण्यासाठी पुन्हा जावे लागले. मतदानाच्या दिवशी निरगुडसर येथे येऊन त्यांनी मतदान केले. वळसे पाटील यांच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा झाली आहे. गुरुवारी पक्षाच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. दिवसभर ते बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर आज मंचर येथील त्यांच्या पूजन प्रेस्टिज या कार्यालयात तीन तास थांबून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली. त्यांच्यासमवेत शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, हभप पांडुरंग महाराज येवले व कार्यकर्ते होते.
मतदारसंघातील शेकडो नागरिक वळसे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. काही ग्रामस्थांनी निवेदने देऊन विकासकामासाठी निधी देण्याची मागणी केली. शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संख्या जास्त होती. वळसे पाटील यांनी नागरिकांबरोबर सविस्तरपणे चर्चा केली. काही ठिकाणी फोन करून प्रश्न मार्गी लावले. दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली. विशेषत: पश्चिम आदिवासी पट्ट्यात कमी झालेल्या मतदानाबाबत त्यांनी आदिवासी भागातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. माजी उपसभापती नंदाराम सोनवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार वळसे पाटील यांनी केला. पुढील दोन दिवस ते तालुक्यात थांबणार असून नागरिकांना भेटणार आहे.
भाजलेल्या ओल्या शेंगांचा आस्वाद
मंचर येथील कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत गप्पा मारताना भाजलेल्या ओल्या शेंगांचा आस्वाद सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला. कार्यालयात तीन तास थांबूनही नागरिकांची गर्दी कायम होती. यावेळी बाहेर येऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. आजारपणानंतर मला सलग तीन तास एका ठिकाणी बसण्यास डॉक्टरांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे आपण यापुढेही भेटत राहू असे त्यांनी सांगितले.