शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:54 PM2024-03-20T12:54:31+5:302024-03-20T12:56:00+5:30
पक्षाच्या हितासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करणार असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले....
- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव (पुणे) :पुणे जिल्हात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अखेर दिलजमाई झाली आहे. मंगळवारी (दि. १९) पत्रकारांशी वार्तालाप करताना दिलीप मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या हितासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करणार असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.
आमदार दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला माझा विरोध होता. त्याबाबत मी माझी भूमिका स्पष्टपणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडली होती. दरम्यान, रविवारी (दि. १७) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरुर, भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके, शिवाजी आढळराव पाटील, विलास लांडे, चेतन तुपे, प्रदीप कंद आदी प्रतिनिधींची अजित पवार यांनी मतं जाणून घेतली.
शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देणे फायद्याचे ठरणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा जर फायदा होणार असेल, तर मी माझ्या काही भावभावना असेल काही विचार असतील, तर ते बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु हे सर्व करत असताना माझ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची मतं आजमावून घ्यावीत, त्यांना विश्वासात घेतलं जावं, अशा प्रकारची अट वरिष्ठांना घातली आहे, तसेच शिरुर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सोपविण्यात यावी, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उमेदवाराचे काम केले जाईल, अशी भूमिका आपण अजित पवारांकडे मांडली आहे. याबाबत बुधवारी (दि.२०) उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर, खेड तालुक्यातील राजकीय चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.
सद्यस्थितीत आढळरावांना पाठिंबा... माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची राजगुरुनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले होते. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे पहिल्यांदाच आपल्या घरी आले, म्हणून आपण त्यांचे स्वागत केले. मात्र, आमचा संघर्ष टोकाचा असून, माझा त्यांना कायमच विरोध राहील, असे आमदार मोहिते पाटलांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्यानंतर मोहिते पाटलांनी एक पाऊल मागे येत, सद्यस्थितीत तरी आढळरावांना पाठिंबा दर्शविला आहे.
‘पक्षनेतृत्व एकदा मोठा निर्णय घेत असेल, तर तो मान्य केला पाहिजे. कारण त्यात पक्षाचे हीत असते. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी देणार आहे. मी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार आहे.’
- दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड विधानसभा.