- चंद्रकांत मांडेकर
चाकण (पुणे) : शिरूर लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे या वेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उतरणार आहेत. त्यांच्या या चौथ्या पक्षप्रवेशाला शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा देत चिमटा काढला. हाच धागा पकडून त्यांनी शिरूरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी होणार आहे, असा टोला मारला.
शरद पवार यांनी शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर केल्यापासून ते मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा गुरुवारी (ता. २१ मार्च) दौरा केला. त्या दौऱ्यात राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी एखादा योद्धा शरण येत नाही, तेव्हा त्याला बदनाम केलं जातं, अशी प्रतिक्रिया 'ईडी'ने मद्य धोरण घोटाळ्यातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेवर दिली होती.
अजित पवारांवर टीका-
केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर जे झुकत नाहीत, त्यांचा केजरीवाल केला जातो आणि जे झुकतात त्यांना एका वॉशिंग मशीनमध्ये घालून सत्तेत सामील करून घेतले जाते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केला. शरण जाण्यापेक्षा लढणं पत्करणाऱ्या केजरीवालांचे त्यांनी कौतुक केलं.
प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण
मोदी गॅरंटी ही देशाची दिशाभूल असल्याची टीका कोल्हे यांनी या वेळी केली. अब की बार, चारसो पार, म्हणता मग दोन पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी) का फोडता, तिसऱ्या पक्षाचे (काँग्रेस) नेते का पळविता, अशी खोचक विचारणा अमोल कोल्हे यांनी केली. हे कमी म्हणून की काय मनसे नेत्यांच्याही गाठीभेटी घेणाऱ्या भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजितदादा आणि मोहितेंच्या भेटीवर कोपरखळी
आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पराभवासाठी अजित पवारांना एवढी मोठी ताकद उभी करावी लागल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष असूनही त्यांना एखाद्या आमदाराची (आढळरावांच्या राष्ट्रवादीकडूनच्या उमेदवारीला विरोध करणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी यावे लागणे, ही परिस्थिती खूप बोलकी आहे, ती सारेकाही सांगून जात आहे, अशी कोपरखळी त्यांनी परवाच्या अजितदादा आणि मोहितेंच्या भेटीवर मारली.