- किरण शिंदे
पुणे : महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली. वंचितने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. वंचितने तिसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे तर शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांना मैदानात उतरवलं आहे. तर शिरूर लोकसभेसाठी मैदानात उतरलेले मंगलदास बांदल कोण आहेत? आणि त्यांच्या उमेदवारीनं शिरूरचं राजकीय गणित कसं असणार ते जाणून घेऊया.
पैलवान असलेले मंगलदास बांदल हे कायमच वादात राहिले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राहिलेत. मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. मात्र विविध गुन्हे दाखल झाल्याने ते कायमच वादग्रस्त ठरलेत. जिल्हा बँकेत केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ते जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते. मागच्या वर्षीच त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. तसेच फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
मंगलदास बांदल हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितला प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. याशिवाय मंगलदास बांदल यांनी 2009 ला भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदेवरही निवडून गेले होते. तर 2019 मध्येही त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत पुन्हा राजकीय बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून कुठल्याही पक्षांनी त्यांना स्वीकारले नव्हते.
आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत मंगलदास बांदल यांना शिरूर लोकसभेत उमेदवारी देण्यात आली. बांदलांच्या एन्ट्रीने शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीची इंट्री झाल्याने शिरूरच्या राजकारणातही चुरस निर्माण झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचितचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर बसला होता. त्यामुळे यावेळीही तीच परिस्थिती राहिली तर ज्या ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीला झळ बसू शकते आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो.