Shivajirao Adhalrao Patil ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. आढळराव पाटलांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमधील राजकीय गणिते बदलली आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा आपल्याकडेच राहायला हवी, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार, याबाबत मोठी चर्चा झाली. महायुतीत झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे निश्चित झालं. त्यामुळे आज आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा चुरशीचा सामना होईल.
दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आढळराव पाटील यांच्या पाठीशी यंदा पक्षाचे स्थानिक नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेत्यांचे बळ असणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.