Shirur Lok Sabha ( Marathi News ) : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पक्षातील आमदार आणि पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांचा मोठा समूह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची राजकीय ताकद क्षीण झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडून नव्याने मान्यता मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची बांधणी करत लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीविरोधात आव्हान उभं केलं. पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी दाखवलेल्या लढाऊ बाण्यामुळे राष्ट्रवादीचं प्राबल्य असणाऱ्या भागात पवार यांच्याप्रती सहानुभूती असल्याचं बोललं जात आहे. याबाबतचा प्रश्न आज अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आल्यानंतर वळसे पाटील यांनीही होकारार्थी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट दिसत आहे का? असा प्रश्न आज शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान दिलीप वळसे पाटलांना विचारण्यात आला. त्यावर "सहानुभूतीची लाट असणार ना," असं उत्तर वळसे पाटलांनी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात वळसे पाटलांची भूमिका महत्त्वाची
शिरूचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद आढळरावांच्या पाठीशी उभी राहणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांचंही शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठं राजकीय वलय आहे. मात्र वळसे पाटलांना दुखापत झाल्याने ते प्रचारापासून दूर होते. घरात झालेल्या दुर्घटनेत दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. तसंच त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर नुकतीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांबाबत मतदारांमध्ये सहानुभूती असल्याचं मान्य केल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत.