Shivajirao Adhalrao Patil ( Marathi News ) : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला असला तरी सध्या ते महाविकास आघाडीसोबत आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडायला तयार नसून शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी आज सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत ते आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नुकतीच महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी जागावाटपात ही जागा आपल्याकडेच हवी, याबाबत ठामपणे भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांच्या या भूमिकेला सहमती दर्शवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळरावांना महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांना अजित पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश करावा लागणार आहे. अन्यथा अजित पवार हे सध्या भाजपमध्ये असणाऱ्या प्रदीप कंद यांना आपल्याकडे खेचत उमदेवारी देऊ शकतात.
दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील बहुसंख्य मतदारसंघांवर भाजप-शिवसेना या युतीने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ज्या मोजक्या जागांवर यश मिळवता आलं, त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लाभलेली लोकप्रियता आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीच्या जोरावर अमोल कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र पराभवानंतर मागील पाच वर्षांत आढळराव पाटील यांनी वारंवार मतदारसंघ पिंजून काढला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.