शिरूर : भांडय़ांना पॉलीश करण्याच्या बहाण्याने दोन चोरटय़ांनी एका ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील 16 तोळे दागिने भरदिवसा बळजबरीने ओरबाडून पोबारा केला.
येथील यशवंत वसाहतीतील संतोष शिवाजीराव शितोळे यांच्या घरात हा प्रकार घडला. चोरटय़ांची छबी वसाहतीतील एका घराच्या सीसी टीव्ही कॅमे:यात बंद झाली असून, त्याचे चित्रण पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाचे सभापती शितोळे यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितोळे हे घरातून बाहेर गेल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन जण त्यांच्या घरी गेले. आई पार्वतीबाई व पत्नी सुरेखा या घरात होत्या.
सोने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर सुरेखा यांनी त्यांच्या पतीस भ्रमणध्वनीवर घडलेला प्रकार कळविला.
यानंतर शितोळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. वसाहतीतील पेद्राम यांच्या सीसी टीव्ही कॅमे:यात चोरटे कॅमेराबंद झाले. दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(वार्ताहर)
4या दोघांनी भांडय़ांना पॉलीश करून देतो, असे सांगितले. यावर सुरेखा तिथे आल्या व त्यांनी याला नकार दिला. मात्र, ते बळबजबरीने आत शिरले व पॉलीशच्या पावडरने तांब्याचे भांडे पॉलीश करून दाखविले व लागलीच ती पावडर पार्वतीबाई यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या व बांगडय़ांना जबरदस्तीने लावली. हे सोने काळे पडल्याने पार्वतीबाई त्यांच्यावर ओरडल्या. यावर या दोघांनी सुरेखा यांना गरम पाणी आणा सोने स्वच्छ करून देतो, असे सांगितले. त्या पाणी आणण्यास गेल्या असता या दोघांनी बळजबरीने पाटल्या, बांगडय़ा, गळ्यातली मोहनमाळ (सर्व मिळून साडेपंधरा तोळे) काढून घेतली. सुरेखा यांनी गरम पाणी आणल्यावर चोरटय़ांनी सोने पाण्याने भरलेल्या डब्यात टाकले व पुन्हा सुरेखा यांना हळद आणण्यास सांगितले. सुरेखा या हळद घेण्यासाठी किचनकडे जाण्यासाठी वळाल्यावर चोरटय़ांनी शिताफीने डब्यातून सोने काढून घेतले व पसार झाले.