शिरूर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदी विजय दुगड व शिवसेना शहरप्रमुख संजय देशमुख यांची निवडही पीठासन अधिकारी, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी जाहीर केली.नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे. उपनगराध्यक्षपदासाठी विहित वेळेत धारिवाल यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने पीठासन अधिकारी वाखारे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. स्वीकृत सदस्यपदासाठी आघाडीने सर्वसहमतीने शिक्कामोर्तब केलेली दुगड व देशमुख यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या दोघांच्या अर्जांची छाननी करून, हे दोन्ही अर्ज वैध ठरवले. या कार्यालयाकडून आलेली नावे आज वाखारे यांनी जाहीर केली.नगराध्यक्षा वाखारे यांच्या हस्ते धारिवाल, दुगड व देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना धारिवाल म्हणाले की, मला तिसऱ्यांदा उपनगराध्यपदाची संधी मिळाली. गेली दहा वर्षे पदाचा व सत्तेचा उपयोग फक्त शहराच्या विकासासाठीच केला. पारदर्शक कारभाराचा आदर्श सर्वांसमोर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. येथून पुढे विकास व पारदर्शकता हाच अजेंडा ठेवून काम करणार. दुगड म्हणाले की, स्वीकृत सदस्य होण्याची ही दुसरी संधी असून, मागील पाच वर्षांत जसे विकासाभिमुख काम केले, तसेच पुढील पाच वर्षांत काम करून जनतेला आघाडीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. देशमुख म्हणाले की, नगर परिषदेच्या विकासात शिवसेना या माझ्या पक्षाचा व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सहकार्याचा सहभाग असेल, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, नेते प्रभाकर डेरे, सचिव मनसुख गुगळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, मनीषा गावडे, उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, सुनीता कालेवार, रवींद्र ढोबळे, संघपती शांतिलाल कोठारी, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, आजी, माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नागरिकांनी उपनगराध्यक्ष धारिवाल, स्वीकृत सदस्य दुगड व देशमुख यांचा सत्कार केला. (वार्ताहर)
शिरूरला आघाडीचे प्रकाश धारिवाल : स्वीकृत सदस्यपदी विजय दुगड व संजय देशमुख यांची निवड
By admin | Published: February 16, 2017 2:43 AM