शिरूर तालुक्यात भारनियमनाचे सावट सर्वत्रच पसरले असून, ज्या भागात पाणी आहे, त्या भागात भारनियमनामुळे उभी पिके जळताना शेतकऱ्यांना पाहावी लागत आहेत. तर दुसरीकडे, शेतीलाच काय तर प्यायलाही पाणी नसल्याने भारनियमनाबाबत त्यांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.टाकळी हाजी विभागात पाणी आहे; मात्र १५ ते १८ तासांच्या भारनियमनामुळे पिके जळू लागल्याचे वास्तव आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंब सुकू लागल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनीच सांगितले. शेतीपंपासाठी असणारी (थ्री फेज) वीज दुपारी दोनला जाते ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठलाच येते. जवळपास १८ तासांचे हे भारनियमन असून, त्यामुळे पिकांचे नियोजनच कोलमडल्याचे गावडे यांनी सांगितले. पश्चिम पट्ट्यात पाबळ विभागात ८ तासांचे भारनियमन आहे. कान्हूरमेसाई भागातही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. तळेगाव- ढमढेरे विभागात उद्यापासून ८ तासांचे भारनियमन सुरू केले जाणार आहे. न्हावरे, मांडवगण फराटा, शिरसगाव काटा, कुरुळी या पूर्व पट्ट्यात पाण्याची स्थिती सध्या ठीक आहे. कुरुळी भागात मोठ्या प्रमाणावर तरकारीचे पीक घेतले जाते. रांजणगाव सांडस परिसरात तर फक्त ४ ते ५ तासच वीज असते. बाकीचा वेळ अघोषित भारनियमनाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. निमोणे-गुनाट भागात फक्त ८ तास वीज असते. म्हणजे १६ तासांच्या भारनियमनाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम ऊस, भुईमूग व चारा पिकांवर झाला आहे. कोरेगाव भीमा भागात नेरेगाव, सणसवाडी, डिंग्रजवाडी, दरेकरवाडी, वढू बुद्रुक या ठिकाणी भारनियमन सध्या नाही. मात्र, पिंपळे जगताप भागात आठ तासांचे भारनियमन केले जात आहे.
शिरूर तालुक्यात शेतीलाच काय, प्यायलाही पाणी नाही!
By admin | Published: May 06, 2017 1:39 AM