शिरूर : महिनाभरात ५०हून अधिक डेंगीसदृश रुग्ण आढळून आले असून, शहर व तालुक्यात तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसात होणाऱ्या ओपीडीमध्ये शंभरावर रुग्ण हे तापाचे आढळून येत आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक नकाते यांनी दिली.साथ आटोक्यात येण्यासाठी नगरपषिद आरोग्य विभाग व तालुका आरोग्य विभाग संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीला सोनारआळी, भाजीबाजार या भागातून सुरू झालेली डेंगीची साथ आता शहरातील इतर भागातही पसरली आहे. ४ आॅगस्टपासून तालुका आरोग्य विभागाचे तालुक्यातील २२ कर्मचारी शहरात तैनात केले असल्याचे तालुका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.पाण्याच्या साठ्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. नगरपरिषद आरोग्य विभाग धुरळणी करीत आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पत्रके वाटली जात असून ध्वनिप्रक्षेपकाद्वारे आवाहनही करण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून येथे उघड्या टाक्यांच्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ज्यांची बांधकामे आहेत, त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. भंगाराच्या दुकानात तुटकी-फुटकी, प्लॅस्टिकची भांडी असतात, टायर असतात. यातही पाणी साचते. या दुकानदारांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे. यामुळे साथ आटोक्यात येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ‘कोरडा दिवस’ गांभीर्याने पाळणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
शिरूरकर तापाने फणफणले
By admin | Published: August 09, 2016 1:50 AM