शिरूर : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू हाेते. नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मी स्वत: वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. शहराला बारा महिने पाणीपुरवठा होण्यासाठी घोड धरणातून पाणी आणण्यासाठी व शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी ५२ कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार ॲड. अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार पवार म्हणाले, शहरातील न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी ३३ कोटी ८० लाख निधी तर न्यायालय न्यायाधीशासाठी निवासस्थानासाठी साडेचार कोटी रुपये निधी नव्याने मंजूर केला आहे. तसेच नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटी निधी मिळाला असून, तो कमी पडल्याने अतिरिक्त चार कोटींच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. पवार यांनी या मागणील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत टाऊन हॉलचे नियोजन असून, यासाठी सात कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा निधी कमी पडल्यास अतिरिक्त निधीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर शहरातील टपरी पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. परंतु येथील जागे १४ गुंठे जागा एसटी महामंडळाची निघत असल्याने या कामात थोडा व्यत्यय आला असला तरी लवकरच या जागेत टपरी पुनर्वसनाचे काम सुरू होईल. शिरूर शहरातील घोड नदी परिसरातील शनी मंदिर ते सुशिला पार्क या परिसरात चौपाटी व वॉकिंग ट्रॅक व या परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार असून विद्याधाम शाळा परिसरातील क्रीडांगण सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
शिरूरचा चेहरा-मोहरा बदलणार
शहरातील सिद्धीचा पहाड येथे नगर अर्बन प्रकल्पातून वॉकिंग ट्रॅक तसेच बटरफ्लाय उद्यान, एक लाख लिटरचे शेततळे, तसेच मोठ्या प्रमाणात या भागात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शहरात क्रीडांगण व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा असून त्यासाठी जागा पाहून हे क्रीडांगण व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले.