केंदूर : चासकमान धरणातून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना प्रथम मिळण्यासाठी चाकण - शिक्रापूर रस्त्यावर रविवारी या भागातील शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केले. पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपाचे सोडण्यात येत असल्यामुळे शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते. मात्र पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती सहन करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. उन्हाळ्यातील पिकांची या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट असून पाण्यावाचून पिके जळू लागलेली आहेत. शासनाच्या निर्णयामुळे मागील वर्षी याच भागातील उसाचे खूप मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. यंदाही असाच प्रकार पुन्हा होत आहे. जमीन महसूल कायद्यातील कलम ७०/२ नुसार पाणी प्रथम याच भागात देणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये प्रथम करण्यात आलेली होती. त्यामुळे या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आक्रमक झालेले असून पाण्यासाठी मोठा लढा उभा करण्यात आलेला आहे. या वेळी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यावर गुन्हा दाखल करीत आल्याने या वेळी संताप व्यक्त करण्यात आला. या वेळी संबंधित चासकमान पाटबंधारे शाखाधिकारी शंकर संतीकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्याकडे या वेळी निवेदन देण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने समाधान डोके, नीलेश जगताप, जयश्री पलांडे, पुष्पा जगताप, मोहन टाकळकर, धर्मराज वाजे, अशोक बेंडभर, शिवाजी जगताप, सागर शितोळे, विकास मासळकर, दत्तात्रय मासळकर, विजय खैरे, प्रदीप मासळकर, दीपक मासळकर, ज्ञानेश्वर थिटे, नितीन वाजे, ऋषीकेश थिटे, उत्तम बेंडभर, रामभाऊ सोंडेकर, अनिल काशीद, एकनाथ मासळकर व बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. (वार्ताहर)
शिरूरचे शेतकरी आक्रमक
By admin | Published: April 17, 2017 6:34 AM