शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा मर्यादित साठा आहे. मात्र, या साठ्यातूनही पारनेरच्या बाजूने शेतकरी आठ-आठ तास पाणीउपसा करतानाचे दुर्दैवी चित्र आहे. अधिकारी त्यांच्यावर कारवाईच करीत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी होणाऱ्या या पाणीउपशाला पायबंद बसण्याची चिन्हे नाहीत.कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून दोन दिवसांपूर्वी बंधाऱ्यात पाणी आले. मात्र, बंधारा पूर्ण भरला नाही. दोन दिवसांत बंधारा भरण्याच्या आशाही आता संपुष्टात आल्या आहेत. बंधारा अर्धाच भरल्याने नगर परिषदेने काही दिवसांपासून सुरू असलेला दोन दिवसाआड पाणीपुरवठा तसाच पुढे चालू ठेवला. बंधारा भरला असताना दोन महिने शहराला पाणी पुरू शकले असते. मात्र, आता बंधाऱ्यात अर्ध्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे.अशा परिस्थितीतही पारनेर भागातून बंधाऱ्यातील पाणी मोटारीद्वारे (जादा पॉवरच्या) सातत्याने उपसले जात आहे. पिण्याच्या पाण्याचा साठा असतानाही शेतकरी मात्र त्यांचा आडमुठेपणा सोडायला तयार नाहीत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे ठरले असतानाही शेतीसाठी होणाऱ्या या बेसुमार उपशाकडे अधिकाऱ्यांचे मात्र लक्ष नाही. आठ-आठ तास मोटारीद्वारे अशाच प्रकारे शेतीसाठी पाणी उपसले गेल्यास पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन शहराला पाणी संकटाला सामोरे जावे लागू शकते. पारनेरच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी शिरूरच्या नागरिकांची अपेक्षा आहे.
शिरूरचा पाणीप्रश्न पुन्हा होणार गंभीर
By admin | Published: May 08, 2016 3:22 AM