नारायणगाव (पुणे) :शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी ( ता. जुन्नर ) येथे शिवरायांच्या जन्मसोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडल्याने शिवजयंती सोहळ्यास गालबोट लागले. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असताना फ्लेक्स फाडले गेल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तर, मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच फाडलेले सर्व फ्लेक्स काढण्यास भाग पडले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिवनेरीवर पाय ठेवून देणार नाही, असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने फ्लेक्स फाडून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला की काय? याची तपासणी पोलीस प्रशासन करत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा हा शासकीय कार्यक्रम असल्याने एक दिवस अगोदर पासूनच किल्ले शिवनेरी आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. शिवजयंती सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठराविक व्यक्तींनाच व्हीआयपी पास दिला जातो. तर, पास असलेल्या व्यक्तींनाच किल्ले शिवनेरीवर प्रवेश दिला जातो. शिवजयंती सोहळा संपल्यानंतर मुख्यमंत्री व इतर मंत्री गेल्यानंतरच राज्यातून आलेल्या शिवभक्तांना शिवनेरी किल्ल्यावर सोडण्यात येते. सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरने येणार होते. तत्पूर्वीच, रस्त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे लावलेले सर्व फ्लेक्स काढण्यात आले. अचानक झालेल्या या कृत्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. फाडण्यात आलेले फ्लेक्स काढून अन्यथा हलवण्यासाठी पोलिसांसह प्रशासकीय कर्मचाऱ्याची धावपळ उडाली होती. मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना शिवनेरीवर पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळे, हे कृत्य मराठा क्रांती आंदोलकांनी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने पोलीस प्रशासन तपास करीत आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी किल्ले शिवनेरी वर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर वर दगडफेक करण्यात आली होती.