पुणे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून उमटला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना मोहोळ म्हणाले, शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, विविध संघटनांना मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. याचबरोबर या आठवड्यात पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवजयंती महोत्सवासाठी रथयात्रा आणि मिरवणूक यासाठी स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात असेही विनंती सर्व शिवप्रेमींकडून यावेळी करण्यात आली. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात अशी सूचनाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.