विश्रांतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी १९ फेब्रुवारीला व भीमजयंतीला १४ एप्रिलला ‘ड्राय डे’ घोषित करून या दोन्ही दिवशी राज्यातील सर्व दारूविक्री बंद ठेवण्याची मागणी विश्रांतवाडीतील समाज प्रबोधन ग्रुपने शासनाकडे केली आहे. यासाठी २५ हजार नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन शासनाला देण्यात आले.
याबाबत या ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडून मागील ४ वर्षे पाठपुरावा सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या काही भागात ही मागणी मान्य करून ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. मात्र शिवजयंतीला संपूर्ण राज्यात ड्राय डे करण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी व्यसनाला आपल्या जीवनात अजिबात थारा दिला नाही. या मागणीसाठी कार्यकर्ते मागील ४ वर्षांपासून शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. यावर्षीची शासनाला दिलेल्या निवेदनावर २५ हजार नागरिकांनी सह्या केल्या आहेत. यावेळी विशाल सीता सोनावणे, संजय रासकर, अभिजित चव्हाण, विशाल साळवे, रोहित कासारे उपस्थीत होते.