पुणे : गेल्या ३२ वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते असणारे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांदीची १५ किलोची गदा देणार आहेत. आज मुंबईत उद्धव ठाकरेंची बीकेसीच्या मैदानावर विराट सभा होत आहे. या सभेसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत गर्दी करत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक बीकेसीवर पोहचले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधून गेलेले कार्यकर्ते आज उद्धव ठाकरेंना १५ किलोची गदा देणार आहेत.
हे सर्व कार्यकर्ते दिघी गावातील आहेत. "साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही घंटाधारी नाही तर आम्ही गदाधारी आहोत. आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत. साहेबांना ही गदा देऊन किरीट सोमय्याचं डोकं फोडायचं आहे. जी लोकं साहेबांना त्रास देतात त्यांना या गदेने ठेचायचं आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवडमधून आलेल्या शिवसैनिकांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यांच्या विषय काढल्याने त्यावरूनही राज्यात मोठे राजकारण होताना दिसत आहे. आजच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.