पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आज गुडलक चौकात कोंबड्यांसह आंदोलन केले असून डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्याचा राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या. त्यानंतर गुडलक चौकात शिवसैनिकांनी आंदोलन करीत नारायण राणे यांचा निषेध केला. सुमारे १० ते १५ मिनिटे हे आंदोलन सुरु होते. त्याचवेळी एका बाईकवरुन जाणार्या दोघांनी आर डेक्कन या मॉलवर दगड फेकून मारला. त्यामुळे मॉलच्या काचेला तडा गेला आहे़ शहरात महत्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.