पुणे : पुण्याची मेट्रो काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत राहिली आहे. मेट्रो प्रशासनाच्या नावावरून अनेकदा राजकीय आंदोलनं झाली आहेत. पिंपरी चिंचवडमधील भोसरी स्टेशनच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला होता. या भागातील भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आता शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावाचा नवा वाद समोर आला आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्याठिकाणी कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला आहे.
कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवार पेठ नाव देण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून हे नाव बदलण्या संदर्भात पत्र दिले असूनही मेट्रो प्रशासनाने याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. आजही या स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला आहे. या विरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून आज आखेर कसबा पेठ स्टेशन असा बोर्ड लावला. मेट्रो प्रशासनाकडून कसबा पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन नाव बदलून कसबा पेठ स्टेशन हे नाव दिले जात नाही तोवर कसबावासी शांत बसणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतली.
पुण्यातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या बुधवार पेठेत मेट्रो स्थानक तयार होणार होते. त्यानुसार महामेट्रोच्या प्रकल्प अहवालात बुधवार पेठ मेट्रो स्टेशन नाव देण्यात आले. मात्र जागेअभावी बुधवार पेठेत स्टेशन तयार करणं अवघड होते. त्यामुळे ते हलवून कसबा पेठेत साततोटी पोलीस चौकीजवळ स्थानकाचे काम सुरु करण्यात आले. परंतु अहवालात मात्र स्थानकाच्या नावाचा बदल केला नाही. दोन्ही पेठांमध्ये बरेच अंतर असल्याने या स्थानकाचे नाव चुकीचं असल्याचे समोर आले आहे.