पुणे : शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी पक्षाने पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेना आम्हाला सोबत घेण्यास इच्छुक आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते योगेश पांडे, शिवसंग्रामचे संपर्कप्रमुख तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे संपर्कप्रमुख किरण शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. राज्यात भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या तीनही पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आम्हाला अपेक्षित असलेल्या जागांची यादी भाजपकडे दिली आहे. भाजपने सोबत न ठेवल्यास एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाऊ. अन्य कोणत्याही पक्षाशी महायुती केली जाऊ शकते. रिपब्लिकन पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता भाजपसोबत स्थानिक निवडणुकांसाठी युती केली, असे सांगण्यात आले. पुण्यात स्वाभिमानी पक्षाने ७/८, शिवसंग्रामने १८ तर रासपने २५ जागांची मागणी केली असून, त्यांपैकी काही जागांबाबत आग्रही असून, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांमध्ये या पक्षांचे उपद्रवमूल्य आहे. २९ तारखेला महादेव जानकर, विनायक मेटे व राजू शेट्टी हे पक्षनेते कोणत्या पक्षासोबत यावे, तिन्ही घटकपक्षांनी किती जागा लढवाव्यात, हे एका बैठकीत ठरवतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
शिवसंग्राम, रासप आणि स्वाभिमानी शिवसेनेसोबत
By admin | Published: January 24, 2017 1:43 AM