पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महापालिकेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी काल शिवाजीनगर पोलिसांनी एकाला क्वॉटरगेट येथून पकडले होते. सनी गवते असे त्याचे नाव आहे. किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केल्यावर शहर प्रमुख संजय मोरे व इतरांचा शोध घेणे सुरु होते.
कार्यकर्ते स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर
त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आज स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी यांच्यासह सात शिवसैनिक आज पोलिसांसमोर हजर झाले. या शिवसैनिकांना थोड्या वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल सनी गवते नावाच्या शिवसैनिकाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आणि न्यायालयाकडून त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता.