लाेकमत न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : पवारसाहेबांचा वरदहस्त डोक्यावर म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदाराला काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करीत आहेत. पवार साहेबांमुळेच महाविकास आघाडी सरकार आहे, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.
खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मार्गासाठी प्रयत्न केले. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री, माजी खासदार यांचे छायाचित्र व नाव नसल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्त्य संतप्त झाले होते. यामुळे माजी खासदार आढळराव-पाटील यांनी शिवसेनेचे कार्यकर्त्यासह येऊन शुक्रवारी खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. या वेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी शनिवारच्या कार्यक्रमात उत्तर दिले.
कोल्हे म्हणाले, खेड घाटाचे उद्घाटन हे कुठल्याही श्रेयवादाचा भाग नाही. श्रेय द्यायचे असेल तर ते नितीन गडकरींनाच द्यायला हवे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे आता वय झाल्याने असा अनधिकृतपणे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा ते करीत आहे. बैलगाडा, विमानतळ, रेल्वे यावरून टीका करून माजी खासदार श्रेयवादासाठी धडपडत आहेत. जुलै २० मध्ये या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पूर्ण झाले. आढळराव १५ वर्षे खासदार असूनही त्यांना चाकणची वाहतूक कोंडी सोडविता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामात फक्त आढळराव हे राजकारण करीत असल्याचे कोल्हे म्हणाले.
दिलीप मोहिते म्हणाले, माझ्या काळात तयार झालेल्या इमारतींचे उद्घाटन स्व. सुरेश गोरे व आढळरावांनी केेले. मी यांच्यासारखी नौटंकी केली नाही. घाटाचे उद्घाटन करून त्यांनी काय साधले हे कळत नाही. निष्क्रिय आढळरावांच्या या नौटंकीचा आम्ही जाहीर निषेध करतो. रस्त्यातील अडथळे जेसीबीने काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचे पोलीस संरक्षण काढावे. आंबेगावात सहकार्य तर, खेडला विरोध हे आढळरावांचे दुटप्पी धोरण योग्य नाही.
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जुन्नरचे संजय काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, अनिल बाबा राक्षे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती रामदास ठाकूर, दिलीप मेदगे, तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसूम भांबुरे, संध्याताई जाधव, नवनाथ होले, किरण पवार, प्रवीण कोरडे, उमेश गाडे, विलास मांजरे उपस्थित होते.
चौकट
प्रकल्पबाधितांकडून उद्घाटन
खासदार कोल्हे, आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत घाटासाठी जमीन गेलेले शेतकरी देवराम थिगळे यांचे हस्ते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, रोडबाधित शेतकरी पोपट महाराज राक्षे, संदीप दरेकर यांनी या रस्त्यावर असलेले सांडभोरवाडी, झणझण स्थळ, तुकाईवाडी वळण धोकादायक असल्याचे सांगितले. शेतीसाठी रस्ता नाही, यामुळे भुयारी मार्ग करावा, असे त्यांनी सुचवले.
फोटो ओळ : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातील बायपासचे उद्घाटन शेतकरी देवराम थिगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते व मान्यवर.