पिंपरी : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनाही दावा करणार आहे. महापालिकेतील पक्षीय बलामध्ये शिवसेनेकडे असलेले संख्याबळ विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यास पुरेसे आहे. पक्षीय बलाबल पुरेसे नसताना अन्य कोणी दावा करीत असेल तर शिवसेना संधी सोडणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गटनेत्या सुलभा उबाळे ही भूमिका व्यक्त केली. शहरप्रमुखपदी राहुल कलाटे यांची, तर महिला शहर संघटक म्हणून नगरसेविका सुलभा उबाळे यांची नियुक्ती केली आहे. तीन विधानसभानिहाय मतदारसंघांसाठी योगेश बाबर (पिंपरी), गजानन चिंचवडे (चिंचवड) व नगरसेवक धनंजय आल्हाट (भोसरी) यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचा सत्कार शहर समन्वयकपदी निवड झालेल्या आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते झाला.मच्छिंद्र खराडे जिल्हाध्यक्ष म्हणून तर मधुकर बाबर, भगवान वाल्हेकर सल्लागार म्हणून काम पाहाणार आहेत, असे आमदार चाबुकस्वार यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी आणि पुढील कार्याची दिशा याबद्दल आमदार चाबुकस्वार यांनी माहिती दिली. युतीबाबातचे धोरण वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल तेव्हा होईल; परंतु २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ताकदीवर महापालिकेवर भगवा फडकावण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनाही करणार दावा
By admin | Published: January 31, 2015 1:31 AM