पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. या तीनही पक्षांनी वेगवेगळी कारणे देत कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दुसरीकडे भाजपने मात्र हा प्रकार केविलवाणा असल्याचे सांगून दुर्लक्ष केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, थोड्याच वेळात हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील मेट्रो लाईन - ३चा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे .या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमावर पुण्यातील विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे बघायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन यांनी हा कार्यक्रम भाजपच्या प्रचाराचा आहे असा आरोप केला आहे. महिलांना सन्मान भाषा करणाऱ्या भाजपने खासदार सुप्रिया सुळे व वंदना चव्हाण यांना या कार्यक्रमात सन्मानाची वागणूक दिली नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की, महापालिकेच्या मंजुरीआधी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. अखेर सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या आधारावर चर्चा न करता मुख्यसभेत मेट्रोचा विषय मान्य करण्यात आल्याचे म्हटले. सगळ्यात आश्चर्य म्हणजे राज्यात भाजपला सळो की पळो करून सोडणाऱ्या शिवसेनेने मात्र भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर नसल्याच्या कारणावरून कार्यक्रमाला जाण्यास नकार दर्शवला आहे. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले की, नियमानुसार महापौरांचे निमंत्रण पत्रिकेत नाव असणे आवश्यक असून हा पुणेकरांचा अपमान आहे. भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहे.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधकांकडे मुद्दे नसल्याने हा प्रकार सुरु असल्याचे म्हटले.