पुणे : पुणे महापालिकेत सुरू झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 'महाविकास' आघाडी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले मतदान करताना भाजपला उद्देशून म्हणाले की, कदम यांना मतदान करण्याची वेळ आली आहे. ' मी पुन्हा येणार,मी पुन्हा येणार' यातला मी या शब्दाची आडकाठी आल्यामुळे कदम यांना मतदान करत आहे. पुढे लोकमतशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात युतीत दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजप वागली नाही. येत्या दोन दिवसात राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येईल आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. पक्षातून ठरले होते की महाशिवआघाडीच्या उमेदवारांना मतदार करायचे. पुणे महापालिकेत भाजपने शिवसेनेला कायम गृहीत धरले. शिवसेच्या सदस्यांच्या कोणत्याही विषयावर निर्णय त्वरित घेतला गेला नाही. भाजपने शिवसेनेला विधानसभेत जशी वागणूक दिली तशीच पुणे महापालिकेत वागणूक दिली आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आज पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ विराजमान झाले. त्यांना ९७ तर महाविकास आघाडीच्या प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. यावेळी मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ तर पाच नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर होते. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम बघितले.