इंदापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर शिवसेनेने मोठा अन्याय केला आहे. मागील अनेक दिवसांपासून संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यांनी प्रयत्न केला असता तर ते भाजपचे उमेदवार राहिले असते. मात्र, ते स्वत:च स्वबळावर लढण्याचे सांगत होते. त्यातच त्यांना शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही. महाविकास आघाडी नेत्यांनी त्यांना धोका दिल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी आठवले बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करू नयेत. उलट शिवसेनेनेच संभाजीराजेंवर अन्याय केला आहे. काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले होते की, राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचे तसे मत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत न राहता हिंमत असेल तर पाठिंबा काढून घ्यावा.
आठवले पुढे म्हणाले, काँग्रेसने पाठिंबा काढला की, भाजप व आम्ही सरकार करायला तयार आहोत. आमच्याकडे १०५ आमदार असून, अपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी खंबीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा फडणवीस हे कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचे कामही उत्तम होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस मुख्यमंत्री होणे आवश्यक असल्याचे आठवले म्हणाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा इंदापूर तालुका आरपीआयकडून सत्कार करण्यात आला.
कायद्याबद्दल गैरसमज
देशात समान नागरी कायदा झाल्यास मागासवर्गीय जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही. मुस्लिम समाजात समान नागरी कायद्याबद्दल गैरसमज आहेत, त्याबाबत समाजाने गंभीरपणे घेऊ नये. समान नागरी कायदा आला तर लोकसंख्या नियंत्रणासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकणार असल्याचे सांगितले. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआय भाजपसोबत सन्माजनक जागा घेऊन सर्व जागा लढविणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.