पुणे : कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांचे वेतन कमी झाले आहे. एकीकडे जगण्याचे प्रश्न असताना दुसरीकडे महावितरणकडून मात्र भरमसाठ रकमेची वीज देयके नागरिकांना पाठविली जात आहेत. लोकांकडे पैसे नसल्याची जाणीव महावितरणला व्हावी याकरिता शिवसेनेच्या पर्वती विभागाकडून तब्बल सात हजारांची चिल्लर अधिकाऱ्यांना देण्यात आली.
कोरोनामुळे रोजगारासह जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना दररोजची चूल कशी पेटवावी अशी भ्रांत आहे. शासनाने बँक हप्त्यांमध्येही तीन महिन्यांकरिता सूट दिली आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे स्रोत आटले असल्याने लोकांकडे पैसे नाहीत. त्यातच महावितरण लोकांना जादा दराने वीज देयके पाठवित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरली आहे. वीज कापली जाण्याची भिती वाटू लागली आहे. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. विभागप्रमुख सूरज लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अधिका-यांची भेट घेऊन त्यांना तब्बल सात हजारांची चिल्लर भेट दिली. ही चिल्लर अधिका-यांच्या टेबलावर ठेवण्यात आली. नागरिकांची आर्थिक परिस्थिती समजून घ्यावी आणि त्यांना दिलेली वाढीव दराची आणि रिडींग न घेता देण्यात आलेली वीज देयके रद्द करुन नव्याने कमी दराची वीज देयके देण्याची मागणी करण्यात आल्याचे लोखंडे यांनी सांगितले.