लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “भाजपने शह-काटशहाचे राजकारण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवून विषारी प्रचार केला. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी कधीही साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून निवडून या असे सांगितले नाही. बाहुबली राजकारण केले नाही. ग्रामपंचायतींप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल,” असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबद्दल त्या सोमवारी (दि. १८) पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शिवसेनेला संपवू शकतो असा अनेकांना भ्रम होता. राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी महाराष्ट्रात बेबंदशाही सुरु असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. त्याला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनतेने मतपेटीतून चपराक दिली आहे. भाजपच्या विषारी प्रचाराला जनता बळी पडलेली नाही. या निवडणूकीमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपच्या अपप्रचाराला जनतेने उत्तर दिले आहे. पुढील काळात हितसंबंध आड येऊ न देता ग्रामविकासासाठी महाराष्ट्र सरकार सर्व ग्रामपंचायतींच्या मागे ठामपणे उभे असेल.