लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : पुणे -नाशिक महामार्गावरील खेड बायपास व नारायणगाव बायपास या रस्त्याचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. बायपासच्या कामाच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमने सामने आले आहे.
खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही, असे असताना राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि१७) सकाळी खेड व नारायणगाव बाह्यवळण कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. तसे संदेश समाज माध्यमांवरआले. त्यात घड्याळ, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके यांचे छायाचित्र होते. मात्र, माजी खासदार आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून हे उद्घाटन शुक्रवारीच (दि १६) मोठा गाजावाजा करीत उरकून घेतले. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार डॉ. अमोल कोल्हे याना लक्ष केले. आढळराव म्हणाले, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांंनी मतदार संघात गेल्या दोन वर्षातील ठळक कामे दाखवावीत. खेड-सिन्नर चौपदरीकरण काम त्यातही प्रलंबित होत गेलेले खेड घाट बाह्यवळण, नारायणगाव बाह्यवळणाच्या कामांसाठी आम्ही प्रयत्न आणि पाठपुरावा केला. यामुळे या मार्गाचे उद्घाटन करण्याचा अधिकार आमचा आहे. दोन वर्षात रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागतो का? दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटू नये अस टोलाही आढळराव पाटील यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लगावला.
शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे नाशिक रस्त्यावरील खेड घाट व नारायणगाव बायपास या रस्त्याचे काम शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील खासदार असताना मंजूर झाले. नंतरच्या कालावधीत काम बंद पडले होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन आढळराव पाटलांनी हे काम पुन्हा चालू केले. काम पूर्णत्वास येत असताना मागील दीड वर्षात खासदार अमोल कोल्हे यांनी मतदार संघात एकही ठोस काम न करता या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पायाभूत सर्व्हे व इतर सर्व अडथळे पार करण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. रेल्वे काय १ वर्षात आली काय? मात्र कोल्हे रेल्वेचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभुल करत आहे. खेड व नारायणगाव या बाह्यवळण रस्त्याचा मी पाठपुरावा केला आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीने हा रस्ता खुल्ला केला आहे, असे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी सांगितले.
यावेळी आढळराव व शिवसैनिकांनी भगवे झेंडे दाखवून दोन्ही रस्त्याच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या. यावेळी जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, संपर्क प्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, स्वर्गीय आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, जी.प सदस्य बाबाजी काळे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी सरपंच दत्ता गांजाळे, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, खेड तालुका प्रमुख किरण गवारी,उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे राम तोडकर, शिवसेना महिला आघाडीच्या विजयाताई शिंदे, सतीश बाणखेले, कल्पेश बाणखेले, शिवाजी राजगुरू व खेड व आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळ: पुणे -नाशिक महामार्गावरील खेड बायपास रस्ता माजी खासदार आढळराव व शिवसैनिकांनी उद्घघाटन करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला..